राहुरी तालुक्यातील मौजे सात्रळ येथील गट नं.३७९ मधील०.२९ आर हेक्टर जमीनीवर रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अरूण कडू यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण तातडीने काढून जागा बौध्द विहार उभारणीसाठी मोकळी करुन द्यावी यासाठी आज बौध्द समाजाच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात समाज बांधवांनी म्हटले आहे की, सदर जागेची कागदपत्रांवर महारवाडा सात्रळ असा उल्लेख अनेक वर्षांपासून आहे. सदचे क्षेत्र हे समाजासाठी आरक्षीत करण्याचा निर्णयही तत्कालिन जिल्हाधिका-यांनीही कागदोपत्री दिलेला असतानाही मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता या जागेवर रयत शिक्षण संस्थेने विनापरवाना संस्थेची इमारत, सायकलस्टॅन्ड आणि सभागृह उभारुन या जागेवर बेकायदेशिर ताबा मिळविला आहे.
या बाबत वेळोवेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करुन रयत शिक्षण संस्थेने केलेल्या बेकायदेशिर कृत्याबाबत कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मात्र राजकीय दबावातून संस्थेने अद्यापही समाजाच्या जागेवरुन ताबा सोडलेला नाही.
वास्तविक ही जागा बौध्द विहारासाठी उपयोगात आणावी असा सामाजिक हेतू समाजाचा होता. मात्र रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी श्री.अरुण कडू तसेच सात्रळ शाळेच्या मुख्याधिकापीका यांनी आपल्या सर्व राजकीय हीतसंबधांचा उपयोग करुन, समाजाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.
सदर अतिक्रमण काढण्याबाबत संबधितांना तातडीने सुचना द्याव्यात व ही जागा बौध्द विहाराच्या उभारणीसाठी मोकळी करुन द्यावी अन्यथा दिनांक ७ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा भाऊसाहेब पगारे,राजन भाऊ ब्राम्हणे, अनिल पडघलमल, रमेश पडघलमल, सदू मुगदम, पूजा सोनवणे, भाउसाहेब पडघलमल, सुहास ब्राम्हणे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.निवेदन देण्यासाठी बौध्द समजातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.