Ahilyanagar News:- मागच्या वर्षापासून जर आपण बघितले तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून फटका बसला असून अतिशय कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागला.
अगदी अशीच काहीशी परिस्थिती यावर्षी देखील दिसून येत आहे व अगदी सोयाबीनची आवक आता बाजारपेठेमध्ये होऊ लागली असून बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या हमीभावापेक्षा देखील कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करायला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे अगोदर हमीभाव खरेदी फक्त बाजार समिती पुरतीच मर्यादित असायची. परंतु आता इतर नोडल एजन्सीच्या माध्यमातून देखील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी महाकिसान संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सुरावी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाकिसान संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सुरावी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या ठिकाणी नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीनची खरेदी करण्यात येत असून याकरिता महा किसान संघाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 4812 रुपये दर दिला जात आहे.
या खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायची असेल त्यांना ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे व या ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख ही 15 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे व या संबंधीची माहिती महाकिसान संघाचे कार्यकारी अधिकारी प्रा. गंगाधर चिंधे यांच्या माध्यमातून देण्यात आली.
शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीकरिता नेण्याअगोदर त्याची ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणीची सुविधा सुरावी फार्मर प्रोड्युसर कंपनीने रांजणगाव देशमुख येथे उपलब्ध करून दिली आहे.
ही कागदपत्रे लागतील
याकरिता सोयाबीन पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, शेतकऱ्याचे आधार कार्ड तसेच पासबुकची झेरॉक्स व मोबाईल क्रमांक नोंदणी केंद्रावर देणे गरजेचे आहे.
सोयाबीनची नोंदणी झाल्यानंतर खरेदी केंद्राकडून आपणास सोयाबीन घेऊन येण्याची वेळ दिली जाते व यासाठी सोयाबीनची 12 डिग्रीपर्यंत आद्रता निश्चित करण्यात आलेली आहे.
पंधरा दिवसात एकरकमी रक्कम खात्यात होणार जमा
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केल्यानंतर त्यांना पंधरा दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.
तसेच एकरकमी पैसे मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकावे व जास्तीचा मोबदला मिळवण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.