लम्पीग्रस्त जनावरेही होणार आता क्वारंटाइन, पाथर्डीत सुरू होणार पहिले केंद्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे. या संस्थेला परवानही देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत. हे विलगीकरण केंद्र फक्त अहमदनगर जिल्हयातील पशुधनासाठी राहील.

लगतच्या किंवा इतर कोणत्याही जिल्हयातील लम्पी चर्म रोग बाधीत जनावरे या विलगीकरण केंद्रात दाखल करुन घेता येणार नाहीत. विलगीकरण केंद्रात दाखल झालेल्या जनावरांची माहिती संबंधित तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील.

जनावरे लम्पी चर्मरोग बाधीत असल्याचे प्रमाणपत्र पशुधन विकास अधिकारी यांनी दिल्यानंतरच विलगीकरण केंद्रात प्रवेश देणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्येक जनावरास ओळख बिल्ला देणे आवश्यक राहील.

प्रत्येक जनावरासाठी रोज किमान तीन किलो कोरडा चारा व ९ किलो ओला व हिरवा चारा अर्धा किलो उच्च प्रतीचे किमान २० टक्के प्रथिने असलेले पशुखाद्य देणे बंधनकारक राहील.

तसेच प्रत्येक जनावराला किमान ४० लीटर स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी संस्थेची राहील. विलगीकरण केंद्राचे दररोज निर्जंतुकीकरण व धुरीकरण करणे बंधनकारक राहील. अशा २६ प्रकारच्या अटींची पूर्तता केल्यानंतरच सदर विलगीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.