Nilesh Lanke News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असणारे मा. आमदार निलेश लंके यांच्या ‘नगर दक्षिण स्वाभिमान यात्रे’ला नागरीकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
एक एप्रिल रोजी सुरु झालेल्या या यात्रेमध्ये लोक लंके यांना निवडणूक लढविण्यासाठी स्वतःहून यथाशक्ती आर्थिक मदत देखील करीत आहेत. आतापर्यंत हि यात्रा कर्जत जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, राहुरी आदी विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये गेली असून तेथील जनतेशी निलेश लंके यांनी मनमोकळा संवाद साधला आहे.
हि यात्रा शनिवार दि. १३ एप्रिल रोजी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे पोहोचली. पुर्वनियोजित कार्यक्रमांनुसार पारगाव सुद्रिक येते पोहोचण्यास पहाटेचे दोन वाजले तरीही त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये तरुण, वृद्ध, महिला आदी सर्व घटकांतील नागरीकांचा मोठा सहभाग होता. पहाटे अडीच वाजता कार्यकर्त्यांसोबत जेवण केल्यानंतर तेथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातच मा. आमदार निलेश लंके यांनी आराम केला.
याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी, ‘मंदिरात कार्यकर्त्यांसोबत झोपणारा लोकसभेचा हा पहिलाच उमेदवार आम्ही पाहिला. यापुर्वीही अनेक उमेदवार येऊन गेले पण ते कुठल्यातरी तालेवार कार्यकर्त्याच्या घरी जाऊन आराम करतात. परंतु निलेश लंके आपल्या कार्यकर्त्यांसोबत मंदिरात झोपतात हा त्यांच्या साधेपणाचा आणि माणूसपणाचा पुरावा आहे’, अशा भावना व्यक्त केल्या.
निलेश लंके यांनी आपल्या स्वाभिमान यात्रेदरम्यान कुठेही लॉज किंवा तत्सम ठिकाणी आराम केलेला नाही. तसेच कुठल्याही हॉटेल किंवा मोठ्या उपाहारगृहात जेवण केलेले नाही. ते नेहमीच घरगुती साधेसुधे जेवण घेतात.
गावकऱ्यांनी आपुलकीने तयार केलेल्या भोजनाचा ते पंगतीत बसून आस्वाद घेतात.पत्रावळींवर जेवणारा आणि जेवल्यानंतर आपली पत्रावळी आपणच स्वतः उचलणारा उमेदवार पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.