Ahmednagar News : भगवान महावीर जयंती निमित्त रविवारी (दि.२१) सकाळी नगरमधून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सहभागी होत सर्व नगरकरांना शुभेच्छा दिल्या.
भगवान महावीर जयंती निमित्त कापडबाजारातील जैन स्थानक येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. कपडाबाजार, खिस्त गल्ली, बंगाल चौकी, जुनी वसंत टाकी, मार्केट यार्ड मार्गे आनंद धाम येथे ही शोभा यात्रा पोहचली.
तेथे जैन मुनींनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत भगवान महावीरांच्या जीवन कार्याची माहिती दिली. या संपूर्ण शोभायात्रेत निलेश लंके हे सहभागी झाले होते. आनंदधाम येथे त्यांनी आचार्य आनंद ऋषी महाराजांचे दर्शन घेत जैन मुनींचे आशीर्वाद घेतले.
यावेळी प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे. भगवान महावीर हे त्याग, करूणा आणि संवेदनशीलतेचे प्रतिक आहेत. त्यांची संयम, सदाचार, करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे. यामुळे ही शिकवण प्रत्येकाने आत्मसात केली तर प्रत्येकाचे जीवन सुखकर होईल.
यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, योगीराज गाडे, विशाल वालकर, किशोर श्रीमाळ, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.