शिर्डीत लोखंडे यांना स्वपक्षातूनच विरोध, ६ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिर्डी मतदारसंघातील सहा तालुक्यांतील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकत्यांनी राजीनामे देत खा. सदाशिव लोखंडे यांना विरोध दर्शवला आहे.

आता लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख अनिता जगताप व शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले.

ऐन तोंडावर शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा यासाठी भाजपच्या सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही दुजोरा देत जनतेची मागणी आहे तीच माझीपण असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे महायुतीत शिर्डीची जागा कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

माजी नगराध्यक्षा अनिता जगताप म्हणाल्या, उत्तर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची मी एकमेव नगरसेविका आहे. असे असतानाही माझ्यासह सहा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खासदार लोखंडे विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला

माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप म्हणाले, खा. लोखंडे यांनी दहा वर्षात मतदार संघात कोणतीही विकासकामे केली नाही. आंतराष्ट्रीय शिर्डी तिर्थक्षेत्राचा विकास झाला नाही ही शोकांतिका आहे.

याप्रसंगी श्रीरामपूर महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पूनम जाधव, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील उपजिल्हाप्रमुख अर्जुन काशिद, अकोले तालुक्यातील राजूर येथील शहरप्रमुख विक्रम जगदाळे,

श्रीरामपूर तालुकाप्रमुख बापूसाहेब शेरकर, युवा शहरप्रमुख रामपाल पांडे, राहाता उपतालुकाप्रमुख सुभाष उपाध्ये, शिर्डी शहर संघटक नानक सावंत्रे आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्याकडे सुपूर्द केले. हे राजीनामे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवल्याचे सांगितले.

लोखंडेंना निवडणूक सोपी नसल्याचा सर्वे

खा. सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात निवडणुकीपूर्वीच वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत सर्वेतही शिर्डीतून लोखंडेंना निवडणूक सोपी नसल्याचा अहवाल गेला आहे. शिंदे गटातूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावरच लोखंडेंविरोधात उठाव झाल्याने शिर्डीतून लोखंडे यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.