अहमदनगर बातम्या

कालव्यांचे नूतनीकरण; आता शेत फुलेल सोन्यावाणी… कणसं पडणार मोत्यावाणी !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News ; श्रीरामपूर मतदारसंघातील पाटपाण्याच्या प्रश्नावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. कालवे व चाऱ्यांचे नूतनीकरण, वाटरगेज सयंत्र बसविणे याची सरकारने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आदेश दिले असून लवकरच ही कामे मार्गी लागतील, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्याला भंडारदरा धरणाचे पाणी मिळते. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम झाल्याने मतदारसंघातील पाणी कमी होईल. मात्र, त्याची दखल घेऊन मतदारसंघातील सिंचनाचे पाणी कमी होणार नाही व शेतकरी अडचणीत येणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले.

उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधान सचिव दीपक कपूर यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले, असे कानडे यांनी म्हटले आहे.

भंडारदरा लाभक्षेत्रातील श्रीरामपूर हा शेवटचा मोठा तालुका आहे. कालवे शंभर वर्षांपेक्षा अधिक जुने झाल्याने सिंचनाचे ५० टक्के पाणी वाया जाते. त्यासाठी तातडीने कालवे दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

निळवंडेच्या पाण्यातून सर्व अंतिम तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व पाझर तलाव भरले जात होते. निळवंडे धरणाचे कालवे झाल्याने ओव्हरफ्लोचे पाणी मिळणार नसल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ओव्हरफ्लोच्या पाण्यामधून अंतिम तलाव बंधारे भरून देण्याची तरतूद करावी, तालुक्यातील पाणी वाटपासाठी वाटरगेज संयंत्र बसवावेत, तसेच कालवे व चाऱ्यांचे नूतनीकरण करावे, अशी विनंती करण्यात आली.

सततच्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आले आहे. ६ जुलै २०२३ चे आपले पत्र पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिवांकडे पाठवून याबाबतचे प्रस्ताव देण्याबाबत संबंधितांना कळविले आहे. कालवे नूतनीकरणाला १५ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली असून त्यास तांत्रिक मान्यता मिळालेली आहे.

लवकरच त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होणार आहे. गोदावरी पाटबंधारे विभागांतर्गत तालुक्यातील चाऱ्या दुरुस्तीबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. ते कामही लवकरच सुरू होईल, अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.

भंडारदराच्या चालू आवर्तनातून टेल टू हेड सर्व क्षेत्रासाठी पाणी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे कानडे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office