शिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  शिर्डी मतदारसंघ व संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी मंत्री आमदार विखे पाटील गटाकडे असलेल्या चिंचपूर, शेडगाव, झरेकाठी व पानोडी या ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्या,

तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील कनोली व मनोली ग्रामपंचायत विखे गटाने खेचून आणल्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खळी ग्रामपंचायतीत मंत्री थोरात व आमदार विखे पाटील गटांच्या सहमती एकस्प्रेसने बाजी मारली. आश्वी पंचक्रोशीत आ. विखे गटाकडे सात ग्रामपंचायती आल्या तरना. थोरात गटाने सहा पंचायतींवर झेंडा रोवला. अनेक ठिकाणी चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत हवशे, गवशे, नवशे सर्व सहभागी झाले होते.

ओझर बुद्रुक ग्रामपंचायतीत ना. थोरात गटाचे ८ सदस्य निवडून आल्याने ना. थोरात गटाने सत्ता राखली. येथे आ. विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. चणेगाव ग्रामपंचायतीत ना. थोरात गटाने मुसंडी मारल्याने ७ सदस्य विजयी झाले, तर आ. विखे गटाचा अवघा १ सदस्य निवडून आला आहे.

या ठिकाणी १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. दाढ खुर्द ग्रामपंचायतीत आ. विखे पाटील गटाने ७ सदस्य निवडून आल्याने सत्ता राखली असून ना. थोरात गटाचे अवघे २ सदस्य विजयी झाले आहेत. प्रतापपूर ग्रामपंचायतीसाठी आ. विखेंना माणनाऱ्या तीन गटातच सत्ता वर्चस्वाची रस्सीखेच असताना भगवानराव इलग यांचे ६ सदस्य विजयी तर लक्ष्मण आंधळे, विलास आंधळे यांचे ३ सदस्य विजयी झाले आहेत.

पिंप्रीलौकी अजमपूर ग्रामपंचायतीत आ. विखे गटाचे १० सदस्य विजयी झाल्याने विखे गटाने सत्ता राखली आहे. येथे थोरात गटाचा अवघा १ सदस्य विजयी झाला. चिंचपूर येथे विखे गटाला मोठा धक्का बसला असून येथे थोरात गटाचे ८ सदस्य निवडून आले, तर विखे गटाने ५ सदस्य निवडून आल्याने सत्ता गमावली आहे.

मनोली ग्रामपंचायतीत थोरात गटाला धक्का देत विखे गटाने ९ सदस्य निवडून आणत बहुमत मिळवले आहे. येथे थोरात गटाचे फक्त २ सदस्य निवडून आले. औरंगपूर ग्रामपंचायतीत विखे गटाचे ५ तर थोरात गटाचे २ सदस्य विजयी झाले. झरेकाठी ग्रामपंचायतीत थोरात गटाचे ६ तर विखे गटाचे अवघे २ सदस्य निवडून आले.

शेडगाव ग्रामपंचायतीत थोरात गटाचे ६ तर विखे गटाचे ३ सदस्य विजयी झाले. शिबलापूर ग्रामपंचायत विखे गटाचे ७ तर थोरात गटाचे ४ सदस्य विजयी झाले. पानोडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून थोरात गटाचे ८ तर विखे गटाचे ३ सदसय विजयी झाले.