चोरी केलेले सोने विक्रीला घेवून आले अन् जेलमध्ये बसले ! ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : चोरी केलेले सोने सोनाराकडे विक्रीला घेवून आले असता आरोपींना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले, चोरीच्या मोटारसायकलसह ५.४ तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.बोधेगाव (ता. शेवगाव) येथे आरोपींना एलसीबीच्या पथकाने २ किलोमीटरचा पाठलाग करुन पकडले.

लहू वृद्धेश्वर काळे (रा. सोनविहीर, ता. शेवगाव) व दिनेश उर्फ बल्याराम अंगदभोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल, ८० हजार रुपये किंमतीची युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पाथर्डी तालुक्यातील खोजेवाडी निवडुंगे येथील वैष्णवी संकेत ठाणगे या त्यांचे पतीसमवेत मोटारसायकलवरुन शिक्रापूरकडे जात होते. कौडगाव शिवारातील जांब फाट्याजवळ तीन अज्ञात इसमांनी पाठीमागून येवून त्यांना लुटले.

सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने वेगाने फिरवला. तपासाअंती आरोपी लहू काळे व दिनेश अंगदभोसले यांच्याकडे संशयाची सुई गेली. लहू काळे व त्याचा साथीदार युनिकॉर्न मोटारसायकलवर बोधेगाव येथे चोरी केलेले सोने विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिस पथकाने नियोजित ठिकाणी छापा टाकला. पोलिस पथकाची चाहूल लागताच आरोपींनी धूम ठोकली.

मात्र २ किलोमीटर अंतराचा पाठलाग करून एलसीबीच्या पथकाने आरोपींना पकडले. आरोपींनी नगर व सोलापूर जिल्ह्यात ८ ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुली दिली. या प्रकरणी विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी) व कानिफ उद्धव भोसले (रा. वाकी) हे दोघे पसार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे

पोनि, दिनेश आहेर, पोउनि, सोपान गोरे, पोलिस अंमलदार संतोष लेढि, रविंद्र कर्डिले, संतोष लोटके, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, चंद्रकांत कुसळकर व भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दोन जिल्ह्यातील ८ गुन्हे केले उघडकीस एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळलेल्या दोघा आरोपींनी नगर व सोलापूर जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली. एकूण ८ गुन्हे आरोपींकडून उघडकीस आले आहेत. शेवगाव, तोफखाना, पाथर्डी, नगर तालुका व कामती (सोलापूर) येथे आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.