उन्हाळ्यात लिंबाला प्रचंड मागणी असते. विशेषतः सरबतासाठी लिंबू लागते. यंदा लिंबाचे उत्पन्न घटले असल्याने व लिंबाला मोठी मागणी असल्याने भाव गगनाला भिडले आहेत. जवळपास ५० रुपये पावशेर असा भाव लिंबाला भेटत आहे.
बाजारात सध्या पाच- दहा रुपयांना एक लिंबू मिळते आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी लिंबू सरबताऐवजी सरबत बनविण्यासाठी आमसूल वापरले जात आहे. त्यामुळे सरबतासाठी आमसूलची मागणी वाढलेली असून यापासून बनवलेले कोकम सरबत भाव खातेय.
आमसूल म्हणजेच कोकम. कोकमाच्या सालीत साखर भरून ठेवली जाते. त्यातून सुटणाऱ्या रसापासून कोकम सरबत तयार केले जाते. हे सरबत किराणा दुकानांमध्ये अगदी सहज उपलब्ध होत असून ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मागणी वाढली आहे. जेवण बनविण्यासाठी आमसूलाचा वापर केल्याने स्वाद वाढतो.
लिंबू ते कोकम…
अवकाळी पाऊस आणि उन्हाचा तडाखा यामुळे लिंबाचे उत्पादन घटले आहे. अवकाळी पावसाने झाडांना लागलेल्या फळांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात लिंबाचे भाव वाढले आहे.
लिंबाप्रमाणे आमसूल म्हणजेच कोकम हे सुद्धा नैसर्गिक आहे. ५० रुपयांपासून ते अगदी दोनशे रुपयांपर्यंत वेगवेगळ्या वजनाचे कोकम सरबत कॅन किराणा दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. उन्हाळा असल्याने ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
कोकमचे फायदे
कोकमचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आमसूलमध्ये ‘व्हिटॅमिन ए’, ‘व्हिटॅमिन इ’ असते. जुलाब, पोटाच्या तक्रारींवर आमसूल उपयुक्त ठरते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेकजण त्याचे सेवन करतात. थकवा दूर करण्यासाठी आंबट-गोड असलेले कोकम सरबत अनेकांना प्यायला आवडते.