‘हे’ सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारोशेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अक्षरशः अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे.

वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊसपाडून त्यातील एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी. तसेच हे ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. अशी टीका भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.

श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळेशेतजमिनी नापीक झाल्या आहेत.

जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही. आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे.

या सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडीदेखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून, आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे.

या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीरकरून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असेही ते म्हणाले.