Kopargaon News : पाणीप्रश्न सोडविण्याबाबत विवेक कोल्हे यांनी स्वतः वीजबिल भरून शब्द केला पूर्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Koperhaon News : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहाद्दराबाद व शहापूरच्या ग्रामस्थांसाठी असलेल्या उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या कामी संजीवनी सहकार महर्षी कोल्हे शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याच्या भावना असल्याचे वक्तव्य भाजपा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.

याबाबत दिलेल्या पत्रकात राहणे यांनी म्हटले आहे की, उजनी उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागाने कार्यान्वित केली असून, गोदावरी उजव्या कालव्यातून पाणी उचलून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरण्याचे काम सुरू झाले आहे.

या परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्याबाबत विवेक कोल्हे यांनी स्वतः वीजबिल भरून ग्रामस्थांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर या गावांना गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजीपी) योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे वरील गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. त्यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांना भेटून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यावर विवेक कोल्हे यांनी गेल्या २८ नोव्हेंबर रोजी या गावातील ग्रामस्थांसह तहसीलदार संदीप भोसले व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना निवेदन देऊन उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ तातडीने सुरू करून त्यातून येथील पाझर तलाव भरून द्यावेत, अशी आग्रही मागणी केली होती.

गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी गोदावरी उजव्या कालव्यातून उपसा पद्धतीने पाणी घेण्यासाठी विजेची गरज होती; पण वीजबिल थकल्यामुळे पाणी घेण्यास अडचण निर्माण झाली होती. ही अडचणही विवेक कोल्हे यांनी स्वतः थकित वीजबिल भरून दूर केली आहे. शनिवारी (दि.१६) उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ सुरू करण्यात आली आहे.

सध्या गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून, त्यातून पाणी उचलून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरले जात आहेत. या योजनेचा टप्पा क्र.२ लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यातून रांजणगाव देशमुख व अंजनापूर येथील पाझर तलाव भरण्यात येणार आहेत.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, रावसाहेब थोरात, महेश थोरात, बाबासाहेब थोरात, बाबासाहेब नेहे, वीरेंद्र वर्षे, सुनील थोरात, ज्ञानदेव थोरात, वाल्मिक नेहे, त्र्यंबक वर्षे, बाळासाहेब काकडे, गोरख दरेकर, प्रकाश गोर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.