Ahmednagar Politics : लोखंडे की वाकचौरे ? नेवासा मतदारसंघावर अनेक गणिते अवलंबून, कुणाला मिळेल मताधिक्य, पहा..

gadakh

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे व खा. सदाशिव लोखंडे यांची जोरदार फाईट झाली. यात उत्कर्ष रुपवते यांनी देखील मतांचे गणित चांगलेच बिघडवले.

दरम्यान आता असेल म्हटले जात आहे की, नेवासा मतदारसंघ हा किंगमेकर ठरू शकतो कारण येथील एकूण मतदार संख्या व इतर गणिते पाहता निवडणुकीत तालुक्यातून कोणाला आघाडी मिळते याची चर्चा सुरु आहे. या गणितावरच विजयाची सूत्रे देखील अवलंबून असणार आहेत.

नेवासा मतदारसंघ आमदार शंकरराव गडाख यांचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार वाकचौरे यांचा गडाख यांच्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले. त्याचा निश्चितच फायदा वाकचौरे यांना होईल. त्यामुळे त्यांच्या मशालीला आघाडी राहील, असा दावा गडाख गटाकडून केला जात आहे.

तालुक्यातील विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, ग्रामपंचायतींवर गडाख गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. अनेक निवडणुकांत हा गट कोणाच्या पाठीशी राहिला, त्याच गटाला तालुक्यातून आघाडी मिळाली आहे. गडाख यांच्या क्रांतिकारी संघटनेने उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे.

शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाकडून वाकचौरे यांना उमेदवारी असल्याने साहाजिकच गडाख गटानेही मशालीचे मनोभावे काम केले. व्यक्तिगत आमदार शंकरराव गडाखांनी मतदारसंघातील लहान- मोठ्या गावांत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेतल्या. आगामी काळातील ध्येयधोरणे मतदारांना सांगितली. त्यामुळे सहाजिकच गडाख गटाच्या कार्यकर्त्यांनी मशालीसाठी जीवाचे रान केले असल्याचं पाहायला मिळाले.

तसेच येथे भाजपची देखील मोठी वोट बँक आहे. कारण या मतांमुळेच गडाख यांना मात देत मुरकुटे हे आमदार झाले होते. त्यामुळे येथे लोखंडे यांना देखील मत भरपूर मिळतील अशीही चर्चा आहे.
ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व वंचितच्या उत्कर्षां रूपवते यांच्यात लढत झाली आहे. वंचित आघाडी किती मते घेणार, यावरच निकालाचे गणित अवलंबून आहे. तसेच वंचित आघाडी कोणाची अधिक मते घेणार, यावरही या मतदारसंघातील जय-पराजय अवलंबून आहे. वेगवेगळ्या चर्चा झडत असल्या तरी निकालात नेवासा तालुका किंगमेकर राहणार असल्याची चर्चा आहे.

आता वाकचौरेंच्या मशालीला तालुक्यातून निश्चित आघाडी राहणार असल्याचे गडाख यांचे कार्यकर्ते ठाणपणे सांगत आहेत तर लीड लोखंडे यांनाच राहील असे महायुतीचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे आता ४ जूनलाच सर्व गणिते निकालातून स्पष्ट होतील.