Tur Crop Management:- खरीप हंगामामध्ये प्रमुख पिके पाहिली तर महाराष्ट्रात कपाशी आणि सोयाबीन यांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्या खालोखाल दाळवर्गीय पिकांमध्ये तुरीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रामध्ये मुख्य पीक म्हणून देखील तूर लागवड होते व कपाशी सारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून देखील तूर पिकाचा अंतर्भाव केला जातो.
परंतु तुर पिकावर जर पाहिले तर मर आणि वांझ या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होतो व यामुळे तुरीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पादनात देखील मोठी घट संभवते. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
तुर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे व्यवस्थापन करण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे ठरते.त्यामुळे तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता लागवड अगोदर काय उपाययोजना कराव्यात? याबद्दलची माहिती घेऊ.
तुरीवर मर रोग येऊ नये म्हणून लागवडी अगोदर हे काम करा
जर आपण मर रोगाचा विचार केला तर हा रोग फ्युजारीयम ऑक्सिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे होतो व या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जमिनीतून होतो. जेव्हा तुर पिक फुलोरा अवस्थेमध्ये असते व तुरीला शेंगा लागण्याचा कालावधी असतो तेव्हाच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
मागच्या वर्षीच्या पिकांचे अवशेष शेतामध्ये असतील व त्यामध्ये जर बुरशीचे वास्तव्य असेल तरी देखील पुढच्या हंगामामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तुरीचे झाड म्हणून दिसते व पाणी देऊन देखील काहीही फायदा होत नाही.
कारण या रोगाच्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पाण्याचे वहन झाडाच्या वरच्या भागापर्यंत होत नाही व त्यामुळे पाने पिवळी पडायला लागतात व नंतर झाड सुकून मरते. तुम्ही जर झाड उपटून पाहिले तर त्याची मुळे सशक्त दिसतात. परंतु झाडाच्या मुळांचा उभा काप जर केला तर मुळाच्या झायलेम उती काळी पडलेली आढळून येते.
मर रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता प्रतिबंधात्मक उपाय
1- तुरीची पेरणी करण्याच्या दहा दिवस अगोदर एक एकर क्षेत्राकरिता जमिनीमध्ये जेव्हा थोड्या प्रमाणामध्ये ओलावा असेल तेव्हा दोन किलो/ लिटर ट्रायकोडर्मा 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून घ्यावी व जमिनीवर फेकून द्यावे. म्हणजेच माती प्रक्रिया करावी.
2- त्यानंतर बीज प्रक्रिया करताना प्रथम कार्बोक्सिन 37.5 टक्के हे बुरशीनाशक व त्यासोबत थायरम 37.5%( संयुक्त बुरशीनाशक) तीन ग्रॅम व त्यानंतर ट्रायकोडर्मा चार ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
लागवडी अगोदर हे उपाय केल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होऊ शकते. अधिकची माहिती तुम्ही कृषि तज्ञांच्या माध्यमातून घेऊ शकतात.