Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून यावेळी त्या हँट्रटिक साधतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारात वेग घेतला असून अनेक ठिकाणी गाव भेटीवर जोर देऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे व इतकेच नाही तर त्यांच्या प्रचारासाठी प्रचारसभांचे आयोजन देखील मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
याच अनुषंगाने बोधेगाव येथे महायुतीची प्रचार सभा नुकतीच पार पडली व या प्रचार सभेमध्ये आमदार अमित गोरखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जनतेची काळजी घेणारे आमदार मोनिका राजळे विजयाची हॅट्रिक साधणार असून त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त केला.
मोनिका राजळे साधणार विजयी हॅट्रिक- आमदार अमित गोरखे
जनतेची काळजी घेणाऱ्या आमदार मोनिका राजळे विजयाची हॅट्रिक साधणार आहेत. कारण इथे आल्यावर अनेकांशी बोललो तसेच चर्चा केली तेव्हा समजले की मोनिका राजळे यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.
तसेच मतदार संघातील लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या असून त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी गुजरातचे आमदार महेश कासवाल तसेच विवेक मिसाळ, चंद्रकांत काळोखे तसे दादाराव भोसले, बापूसाहेब भोसले, सुभाषराव बर्डे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना आमदार अमित गोरखे यांनी म्हटले की, सत्तर वर्षात काँग्रेसला जे सुचलं नाही ते भाजपने करून दाखवले आहे.
माझ्यासारख्या मागास घटकातील सामान्य तरुणाला विधान परिषदेवर संधी दिली. इतकेच नाही तर लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर ताब्यात घेतले. जम्मू-काश्मीरमधील 370 सारखे कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला यासह बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
या प्रचार सभेत मोनिका राजळे काय म्हणाल्या?
यावेळी बोलताना मोनिका राजळे म्हणाल्या की, दहा वर्षांमध्ये राजकीय तसेच सामाजिक प्रवासात कुठेही मतांच्या पेटीकडे न पाहता, जातिभेद तसेच भेदभाव न करता प्रत्येक गावाला काही ना काही दिले आहे.
सर्व जातीपातीचे लोक विकासाच्या प्रवाहात आले तर तालुक्याला न्याय देता येतो. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते व त्याच भावनेतून मी काम करत आहे असे देखील त्यांनी म्हटले.