पिक कर्ज हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. परंतु यामध्ये शेतकऱ्यांची देखील एक जबाबदारी असते की घेतलेले पीक कर्ज नियमितपणे वेळेत परतफेड करणे हे होय.
असे जे शेतकरी नियमित पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जातो. अगदी याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील एक लाख 54 हजार 840 नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 73 कोटी 85 लाख रुपयांचा व्याजाचा परतावा मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 73 कोटी 85 लाख रुपयांचा व्याज परतावा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील नियमितपणे पीक कर्ज फेड करणाऱ्या एक लाख 54 हजार 840 शेतकऱ्यांना जवळजवळ 73 कोटी 85 लाख रुपयांचा व्याजाचा परतावा मिळणार आहे व त्यापैकी जे शेतकरी हमीपत्र देतील अशा 74 हजार 391 शेतकऱ्यांच्या खात्यावर 37 कोटी 61 लाख रुपयांचे व्याज जिल्हा बँकेने अगोदरच जमा केले आहे.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये जे काही व्याजाची वसुली केलेली होती ती शेतकरी सभासदांना देण्याच्या निर्णयानुसार नगर जिल्ह्यातील बहुतेक कर्जदार शेतकरी सभासदांना वसूल व्याज बँकेने परत केले आहे.
परंतु आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत पिक कर्जावरील वसूल झालेले व्याज देखील कर्जदार शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेच्या माध्यमातून घेतला गेल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
तसेच जिल्हा बँकेने एक मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील एक लाख 54 हजार 840 शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या 73 कोटी 85 लाखांच्या व्याजाचा परतावा सेवा संस्थांच्या करंट अकाउंटमध्ये जमा केला आहे.
त्यानंतर आता एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंतचे पीक कर्जावरील वसूल केलेले व्याज परत करण्याचे प्रस्ताव सोसायटी यांनी जिल्हा बँकेच्या संलग्न शाखेत सादर करून संबंधित शेतकरी सभासदांचे वसूल व्याज परत करण्याची अंमलबजावणी सोसायटी यांना करावी लागणार.
यामध्ये हमीपत्राची आवश्यकता का आहे?
व्याज परतावा योजनेमध्ये प्रक्रिया अशी आहे की शेतकरी जे काही व्याज भरतात त्याचा परतावा शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. परंतु अजून पर्यंत मात्र शासनाकडून हा परतावा आला नसल्यामुळे जिल्हा बँकेने स्वतःच्या भांडवलातून या व्याजाचा परतावा सेवा संस्थांच्या चालू खात्यामध्ये जमा केला आहे.
त्यामुळे जेव्हा शासनाकडून हा व्याजाचा परतावा परत मिळेल तेव्हा शेतकऱ्याला ती रक्कम बँकेला परत करावी लागणार आहे व त्याकरताच प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून त्यासंबंधीचे हमीपत्र घेतले जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.