Electric Vehicle:- पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या गगनाला पोचल्यामुळे अनेकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करत असून बाजारपेठेत देखील अशा वाहनांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार तसेच इलेक्ट्रिक स्कूटर व बाईक्स यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
त्यामुळे काही दिवसांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने धावतील यात शंकाच नाही. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स इत्यादी सारख्या पायाभूत सुविधा अजून देखील कमी प्रमाणात असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर अजून देखील बऱ्याच प्रमाणात मर्यादा येताना दिसून येते. परंतु या परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला तुमच्याकडे असलेले पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असलेल्या कारचे रूपांतर इलेक्ट्रिक कार मध्ये करायचे असेल तर ते तुम्ही करू शकतात. याबद्दलचेच महत्त्वाची माहिती या लेखात आपण घेऊ.
पेट्रोल किंवा डिझेल कारचे करा इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असून तुमच्याकडे जर पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असलेली कार असेल तर तिला तुम्ही इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी लावून तिचे रूपांतरण इलेक्ट्रिक कार मध्ये करू शकतात. पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या अनेक किट आणि या क्षेत्रातल्या कंपन्या बाजारपेठेत उपलब्ध असून त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या वाहनाचे रूपांतर इलेक्ट्रिक मध्ये सहजपणे करू शकतात.
यामध्ये तुम्ही जेवढी पावरफुल किट वापरता तितका चांगला फायदा तुम्हाला होत असतो. यामध्ये आपण पाहिले तर बॅटरीच्या क्षमतेवर इलेक्ट्रिक वाहनाची रेंज अवलंबून असते. प्राप्त अहवालानुसार पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असलेल्या वाहनाचे रूपांतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये करताना जर 12 kWh ची लिथियम आयन बॅटरीचा वापर केला तर ती एका इलेक्ट्रिक चार्जवर सत्तर किमीची रेंज देते. तसेच या ऐवजी जर 22 kWh ची लिथियम आयन बॅटरी चा वापर केला तर ती एका इलेक्ट्रिक चार्जवर दीडशे किमी पर्यंतची रेंज देते. या एका किटमध्ये तुम्हाला बॅटरी, मोटर आणि इतर आवश्यक उपकरणे देखील मिळतात.
यासाठी किती खर्च येतो?
तुम्हाला देखील तुमचे जुने वाहन इलेक्ट्रिक वाहनामध्ये रूपांतरित करायचे असेल तर 20 kW ची इलेक्ट्रिक मोटर आणि 12 kW लिथियम आयन बॅटरी असलेली कार रूपांतरासाठी तुम्हाला चार लाख रुपये खर्च येतो. यामध्ये जर तुम्ही पावरफुल बॅटरीचा वापर केला तर त्याप्रमाणे तुमचा खर्च देखील वाढतो.