आपण जेव्हा कुठलेही वाहन खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या वाहनासाठी एक नंबर येतो व तो खूप महत्त्वाचा असतो. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या असा पासिंग नंबर दिलेला असतो. परंतु या व्यतिरिक्त काही वेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट देखील असतात.
या वेगळ्या असलेल्या नंबर प्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तींनाच दिलेल्या असतात व त्यांचा अर्थ देखील वेगळा असतो. आपण अनेक प्रकारच्या नंबर प्लेट रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना पाहिलेले असतील. त्यामध्ये बीएच नंबर प्लेट असलेली वाहने देखील पाहिली असतील.
तेव्हा बऱ्याचदा आपल्या मनामध्ये नक्कीच आले असेल की बीएच नंबर प्लेट नेमकी काय आहे व ती कोणाला मिळते? त्यामुळे या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण बीएच नंबर प्लेट विषयी संपूर्ण माहिती बघू.
BH नंबर प्लेट म्हणजे नेमके काय?
BH नंबर प्लेट 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. ही सेवा भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून अशा लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे की ज्यांना त्यांच्या कामामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कायम स्थलांतरित व्हावे लागते.
कामानिमित्त या लोकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते व अशावेळी त्यांच्या वाहनांची पुन्हा नोंदणी करण्याची गरज राहू नये व हा त्रास वाचावा म्हणून ही बीएच सिरीज सादर करण्यात आली आहे. बीएच नंबर प्लेट ही प्रत्येकाला मिळत नसून ती काही लोकांनाच मिळते. ही नंबर प्लेट मिळवण्यासाठी काही पात्रता निकष असून त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही नंबर प्लेट मिळवायचे असेल तर त्याकरिता संबंधित व्यक्तीने राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी असणे गरजेचे आहे.
तुम्ही जर संरक्षण क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा बँकेत, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी असाल तर तुम्हाला ही नंबर प्लेट सहज मिळू शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाजगी नोकरी करणाऱ्यांना देखील बीएच नंबर प्लेट मिळू शकते. परंतु यामध्ये अशी अट आहे
की तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात त्या कंपनीच्या चार पेक्षा जास्त राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाखा असाव्यात व तुम्ही त्या कंपनीचे कर्मचारी असावे. तसेच तुम्हाला कामाकरिता बऱ्याचदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते किंवा जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला बीएच नंबर प्लेट मिळू शकते.
BH नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?
1- बीएच नंबर प्लेट करता अर्ज करायचा असेल तर सगळ्यात अगोदर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अर्थात MoRTH च्या वाहन पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
2- या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म 20 भरावा लागेल. याशिवाय तुम्ही चार पेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाखा असलेल्या एखाद्या खाजगी क्षेत्रातील कंपनीचे कर्मचारी असेल तर तुम्हाला फॉर्म 60 भरावा लागतो.
3- तसेच तुम्हाला तुमचे कामाचे प्रमाणपत्र आणि कर्मचारी आयडीची एक प्रत सादर करणे गरजेचे असते. हे सादर केल्यानंतर राज्य प्राधिकरण तुमची पात्रता व्हेरिफाय करते.
4- जेव्हा तुम्ही अर्ज भरता तेव्हा टाईम सिरीज प्रकारातील बीएचचा पर्याय निवडावा. त्यासोबतच कार्यरत प्रमाणपत्राचे प्रत म्हणजेच फॉर्म 60 किंवा अधिकृत आयडी सबमिट करावा.
5- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय तुम्हाला बीएच सिरीज करिता मान्यता देते.
6- हे मान्यता मिळाल्यानंतर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे व ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाहन पोर्टल भारतातील सर्व राज्यांमध्ये जाहीर केलेल्या यादृच्छिक क्रमांक मध्ये बीएच मालिका नोंदणी क्रमांक तयार करेल.