भारतीय दुचाकी उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण पाहिले तर भारतामध्ये प्रामुख्याने होंडा आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचा प्रचंड प्रमाणात दबदबा आहे व त्यासोबत बजाज कंपनीच्या बाईक्स देखील ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यात हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आतापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाईक्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या आहेत व त्या ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस देखील उतरलेले आहेत.
जर आपण या कंपनीच्या बाईक्स पाहिल्या तर यामध्ये स्प्लेंडर ही बाईक ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय अशी बाईक आहे. याच स्प्लेंडरच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त हिरो मोटोकॉर्पने हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकची 2.0 आवृत्ती भारतामध्ये लॉन्च केली आहे.
ही बाईक आता नवीन ग्राफिक्स आणि काही किरकोळ कॉस्मेटिक अपडेट सह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 73 किलोमीटर धावेल असा दावा हिरो मोटोकॉर्पच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
100 सीसी सेगमेंटमध्ये एलईडी हेडलॅम्प असलेली पहिली बाईक
जर आपण या बाईकची रचना पाहिली तर ती साधारणपणे जुन्या मॉडेल प्रमाणेच आहे. यामध्ये चौकोनी आकाराचा हेडलॅम्प सोबत समान क्लासिक डिझाईन देण्यात आले आहे. परंतु याला H आकाराची डीआरएलसह एलईडी युनिट मिळते व त्यामुळे ही शंभर सीसी सेगमेंट मधील पहिली एलईडी हेडलॅम्प असलेली बाईक ठरली आहे.
यासोबतच या बाईकमध्ये इंडिकेटर हाऊसिंग करिता नवीन डिझाईन देखील देण्यात आले आहे. जर आपण या बाईक्स मध्ये देण्यात आलेले फीचर्स बघितले तर यामध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले असून जे मायलेज ची माहिती दाखवण्यास मदत करते.
याशिवाय साईड स्टॅन्ड इंडिकेटर, स्पीडोमीटर,ओडोमीटर, ट्रिप मीटर आणि कमी इंधन निर्देशक रीडाऊट, कॉल आणि संदेश अलर्ट व त्यासोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि बरेच काही फीचर्स देण्यात आलेले आहेत.
किती आहे हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक 2.0 ची किंमत?
ही बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे व या रंगांमध्ये ग्लॉस ब्लॅक, मॅट ग्रे आणि ग्लॉस रेड या रंगांचा समावेश आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 82 हजार 911 रुपये ठेवण्यात आली आहे. जी सध्याच्या मॉडेल पेक्षा तीन हजार रुपयांनी जास्त आहे.