Car Mileage Tips:- कुठलेही वाहन खरेदी करताना त्या वाहनाचे मायलेज किती आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण गाडीचे किंवा कारचे मायलेज उत्तम असेल तर त्याचा आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होऊन पैशांची बचत होत असते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे कमी खर्चात आपल्याला जास्त अंतराचा प्रवास करणे शक्य होते.
परंतु कधीकधी कारने जे मायलेज द्यायला हवे त्यापेक्षा खूपच कमी मायलेज द्यायला लागते अशावेळी हे का घडले? हे शोधून देखील सापडत नाही. त्यामुळे कारचे मायलेज कमी झाल्यानंतर मेकॅनिक कडे जाऊन मायलेज वाढवण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात व यामध्ये आपला पैसा देखील खर्च होतो.
परंतु आपण कधी विचार करतो का की कारचे मायलेज असे अचानक कमी का होते? यामध्ये ड्रायव्हिंग करताना आपल्या छोट्या मोठ्या चुका देखील कारणीभूत असतात. परंतु याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्यामुळे आपण दुर्लक्ष करतो व आर्थिक नुकसानीला सामोरे जातो. त्यामुळे अशा काही चुका जर आपण टाळल्या तर कारचे मायलेज सुधारू शकते किंवा कमी होत नाही.
या चुका टाळा आणि कारचे मायलेज कमी होण्यापासून वाचवा
1- एक्सीलेटर दाबताना घ्या काळजी– बरेच जण जेव्हा कार सुरू करतात तेव्हा एक्सलेटर लगेच दाबतात. परंतु असे केल्याने दोन प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता असते व यातील पहिले नुकसान म्हणजे कारचे मायलेज कमी होते आणि दुसरे म्हणजे ज्यावेळी कार जास्त इंधन वापरायला सुरुवात करेल तेव्हा त्याचे थेट आर्थिक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कारण असे केल्याने इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.
2- बऱ्याचदा रात्री गाडी जेव्हा आपण पार्क केलेली असते आणि सकाळी कुठे बाहेर जाण्यासाठी कार स्टार्ट करतो तेव्हा इंजिन थंड असते. अशावेळी जेव्हा रात्री गाडी पार्क केल्यानंतर सकाळी कार आपण सुरू करतो तेव्हा सुरुवातीला आरपीएम जास्त दिसतो. परंतु काही क्षणातच आरपीएम कमी देखील होतो.
आता तुम्ही लागलीच जास्त आरपीएम वर गाडी चालवली तर फ्रिक्शन वाढते व त्यामुळे गाडीच्या मायलेज वर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कार सुरू करतात तेव्हा तिला लगेच रेस करू नका आणि काही सेकंद थांबून तिचा आरपीएम कमी झाल्यावरच कार चालवायला सुरुवात करा.
कारचे मायलेज कमी होण्यामागे इतर काही महत्त्वाची कारण
या दोन महत्त्वाच्या कारणांशिवाय इतर काही छोट्या-मोठ्या कारणांमुळे देखील कारचे मायलेज कमी होते. जसे टायर मध्ये जर हवेचा प्रेशर योग्य नसेल किंवा कमी किंवा जास्त असेल तरी देखील कारच्या मायलेजवर परिणाम होतो. टायरमध्ये जर हवा कमी असेल व तशा परिस्थितीत देखील कार चालवले तर घर्षण म्हणजेच फ्रिक्शन वाढते व मायलेज कमी होण्याची शक्यता असते.
तसेच वेळेवर गाडीचे सर्विसिंग केली नाही तरी देखील मायलेज कमी होण्याची शक्यता असते. दुसरे कारण म्हणजे इंजिन ऑइल जर खराब असेल तर त्यामुळे देखील घर्षण वाढते व कार पूर्वीपेक्षा कमी मायलेज देते.
त्यामुळे या छोट्या-मोठ्या चुका आणि या कारणांवर लक्ष ठेवून जर तुम्ही काळजी घेतली तर कारचे मायलेज कमी होत नाही.