Onion Market:- केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा निर्यात बंदीपासून तर कांदा दरांबाबतचा गोंधळ अदयाप देखील संपुष्टात येण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस यामध्ये भर पडताना दिसून येत आहे. केंद्राच्या माध्यमातून यावर्षी जवळपास पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे व गेल्या महिनाभरापासून यासाठीची खरेदी देखील सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे.
एवढ्या एक महिन्याच्या कालावधीतच सरकारने पाच वेळेस कांदा दरामध्ये बदल केलेले असताना आठ जिल्ह्यांमध्ये देखील कांदा खरेदी करण्याचे वेगवेगळे दर जाहीर केलेले आहेत. त्यामुळे आणखीनच गोंधळात भर पडली असून एकाच प्रकारच्या शेतीमालाला वेगवेगळे दर केंद्र सरकार कसे देऊ शकते व अशा प्रकारची बुद्धी तरी केंद्र सरकारला कशी सुचते असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारकडून आठ जिल्ह्यांमध्ये कांद्याचे वेगवेगळे दर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून पाच लाख टन कांद्याची खरेदी केली जाणार असून त्याकरिता महिन्यापासून कांदा खरेदी सुरू आहे. या एका महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारने पाच वेळेस कांदा दरात बदल केले आहेत व त्यासोबतच आता मोठा घोळ करत आठ जिल्ह्यातील कांदा खरेदीचे वेगवेगळे दर जाहीर केलेले आहेत.
या प्रकारामुळे आणखीनच गोंधळात भर पडण्यास मदत झालेली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कांद्याची खरेदी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू करण्यात आलेली होती व सुरुवातीला सोळाशे पन्नास रुपये कांद्याला दर देण्यात आलेला होता. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 2105 रुपये तर दोन दिवसांपूर्वी 2555 रुपये प्रति क्विंटलचा दर सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या दरांपेक्षा बाजारामध्ये 300 ते 400 रुपयांनी कांद्याचे दर जास्त निघत असल्याने केंद्र सरकारचे जाहीर केलेली कांदा दर हे बाजारदराशी मिळते जुळते नाहीत. त्यातच आता आठ जिल्ह्यांमध्ये वेगळे दर जाहीर केल्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला आहे.
जर आपण या वेगवेगळ्या दरांमधील फरक पाहिला तर तो जवळपास 629 रुपये 78 पैसे इतका आहे. कारण गुरुवारी म्हणजेच 18 जून रोजी केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने कांद्याचे जे काही दर जाहीर केले होते त्यातील सर्वात जास्त दर हा सोलापूर जिल्ह्यात 2987 रुपये इतका होता. तर सर्वात कमी तर हा नगर व बीड या दोन जिल्ह्यांसाठी म्हणजेच 2357 रुपये 72 पैसे इतका होता. परंतु त्यावेळेस मात्र कांदा बाजारामध्ये 2800 ते 3100 रुपये दर मिळत होता. त्यामुळे सरकारचे दर आणि आणि बाजारातील दर हे सुसंगत नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
सध्या ग्राहक व्यवहार विभाग जाहीर करत आहे कांद्याचे दर
अगोदर नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय खरेदीदार संस्थांच्या पातळीवर कांद्याचे खरेदी दर ठरत असायचे. यावर्षी यामध्ये बदल करण्यात आला असून यंदाच्या खरेदीच्या अगदी सुरुवातीपासूनच कांद्याचे दर हे ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून जाहीर केले जात आहेत. परंतु हे दर पहिल्यापासूनच बाजारातील दरांशी सुसंगत नाहीत. आता तर संबंधित जिल्ह्यातील ज्या काही प्रमुख बाजार समिती आहेत त्या ठिकाणांच्या कांदा दराची सरासरी काढून केंद्राच्या माध्यमातून कांदा दर दररोज येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. म्हणजेच यामागे केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे हेच कळायला मार्ग नाही.
केंद्र सरकारचे जिल्हा निहाय कांदा दर
बीड 2357 रुपये 72 पैसे, नगर 2357 रुपये 72 पैसे, नासिक 2893 रुपये, धुळे 2610 रुपये 75 पैसे, छत्रपती संभाजीनगर 2467 रुपये दहा पैसे, धाराशिव 2800 रुपये तसेच सोलापूर 2987 रुपये 50 पैसे तर पुणे 2769 रुपये 80 पैसे अशाप्रकारे कांदा दरांमध्ये विविधता दिसून येते.