Corn Market Price:- मका हे खरीप आणि रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली जाते. जर आपण सध्या काही महिन्यांपासून मक्याचे दर पाहिले तर ते तेजीत असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड जास्त प्रमाणात होते. परंतु दराच्या तुलनेत बघितले तर मक्याला गेल्या वर्षापासून चांगला दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी मका लागवडीला प्राधान्य दिलेले आहे.
याचीच परिणीती म्हणून यावर्षी खरीप हंगामात मका लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ झाली व गेल्या वर्षी खरिपातील 85 लाख हेक्टर मका लागवडीच्या तुलनेत बघितले तर या हंगामात जवळपास 89 लाख हेक्टर वर मका लागवड पोहोचली.
यामागील प्रमुख कारण म्हणजे मका लागवडीचा जो काही कालावधी होता त्या कालावधीत देखील मक्याचे भाव तेजीत होते व यामुळेच लागवड खालील क्षेत्रामध्ये वाढ झाली.
या कारणामुळे मक्याचे बाजारभाव राहतील चांगले
देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता सरकारच्या माध्यमातून खाण्यासाठी जे काही अयोग्य धान्य आहे त्यापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली होती व त्यामुळेच मागच्या वर्षी इथेनॉल करिता मक्याला चांगली मागणी वाढली. परंतु त्यानंतर इथेनॉल करिता तांदळाचा वापर देशात वाढायला लागला.
परंतु मागच्या हंगामामध्ये देशात तांदळाचे उत्पादन कमी झाले व त्यामुळे तांदळाचे भाव वाढले होते. या अनुषंगाने इथेनॉल कंपन्यांना तांदळापासून इथेनॉल निर्मिती करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणे कमी झाले.
परंतु सरकारने आता इथेनॉलचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले असून त्याकरिता मक्याच्या इथेनॉलचे भाव वाढवले व त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याला चांगली मागणी आली. इथेनॉलच नाही तर मक्याला पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाच्या माध्यमातून देखील चांगली मागणी आली व परिणामी मक्याचे भाव मागील काही महिन्यांपासून वाढले होते.
यंदा कशी राहील मक्याला मागणी?
यावर्षी देखील मक्याला इथेनॉलसाठी मागणी राहणार असल्याने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्या मका खरेदी करत असल्यामुळे आवकेच्या हंगामात देखील मक्याचा बाजार टिकून आहे.
सध्या मोईश्चर म्हणजे जास्त ओलावा असलेला मक्याला तेराशे रुपये पासून दर मिळत आहे. गुणवत्ता असलेला मका आजही 2225 रुपयांनी विकला जात आहे व हा मक्याचा हमीभाव आहे.
सध्या बाजारामध्ये मक्याची आवक सुरू आहे. परंतु नंतर जेव्हा आवक कमी होईल तेव्हा मक्याच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढली तर येणाऱ्या काळात देखील मक्याला चांगला दर मिळेल हे मात्र निश्चित.
सध्या खरिपातील मक्याची आवक परंतु बाजार भाव चांगले
सध्या जर आपण देशातील बाजारपेठेंचा विचार केला तर खरिपातील मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरीदेखील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र वगळला तर इतर राज्यांमध्ये आज देखील मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत.
त्या तुलनेत मात्र मध्य प्रदेश व महाराष्ट्रात भाव हमीभावापेक्षा काहीसे कमी असून या दोन्ही राज्यांमध्ये सरासरी 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर मक्याला मिळत आहे.