Onion Market:- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची मुदतवाढ पुढील आदेश येईपर्यंत वाढवली असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी असून या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे.
परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पाच लाख मेट्रिक टन उन्हाळी कांदा नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात एनसीसीएफ या संस्थेकडून खरेदी केला जाणार आहे.
या अगोदर या प्रकारच्या संस्थांकडून जेव्हा कांदा खरेदी केला जायचा तेव्हा व्यापाऱ्यांची आवश्यकता असायची. परंतु यावर्षी मात्र शेतकऱ्यांना स्वतः आपल्या कांद्याची विक्री करण्याची संधी देण्यात आलेली आहे.
शेतकरी आता नाफेड आणि एनसीसीएफ ला थेटपणे विकू शकतात कांदा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाफेड व भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ या संस्थांकडून यावर्षी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पाच लाख मॅट्रिक टन उन्हाळी कांदा खरेदी केला जाणार आहे व त्याकरिता व्यापाऱ्यांची आवश्यकता नसून शेतकऱ्यांना स्वतः आपल्या मालाची विक्री करण्याची संधी देण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे कांदा विक्रीची रक्कम जमा होणार आहे. परंतु यामध्ये काही जाचक अटी ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याविषयीची नाराजी दिसून येत आहे.
या पद्धतीने कांदा शेतकऱ्यांना विकायचा असेल तर त्याकरिता शेतकऱ्यांना सप्लाय व्हॅलिड(supply Valid) पोर्टल वर नोंदणी करणे गरजेचे असल्याची माहिती देखील एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक ॲनी जोसेफचंद्रा यांनी दिली.
अशा पद्धतीने कांदा विक्रीसाठी असलेल्या सर्वसाधारण अटी
नाफेड आणि एनसीसीएफ या संस्था शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना काही गोष्टींची पूर्तता करून घेणार आहेत जसे की, शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणारा कांदा हा 45 एमएम पुढील असणे गरजेचे आहे.
तसेच विळा लागलेला, पत्ती निघालेला, रंग गेलेला, आकार व्यवस्थित नसलेला, कांद्याला कोंब फुटले असतील तर, बुरशीजन्य कांदा, नरम आणि मऊ झालेला, वास येत असलेला व मुक्त बेले असलेल्या कांद्याची खरेदी केली जाणार नाही.
ही कागदपत्रे असतील तरच थेट कांदा विक्री करता येईल
शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफला थेट कांदा विक्री करायची असेल तर त्याकरिता शेतकऱ्यांकडे आधार कार्डची झेरॉक्स, सातबारा उताऱ्यावर कांदा खरीप हंगाम पिक पेरा लावलेला असणे गरजेचे आहे व त्यासोबतच बँकेचे पासबुकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्र असणे गरजेचे आहे. कागदपत्रे असतील तर शेतकऱ्यांना थेटपणे कांदा विक्री करता येणार आहे.