अमेरिकेत सोयाबीन खातोय भाव ! भारतात मात्र दर दबावात ; कारण काय

Soybean Market India : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जागतिक बाजारात सोयाबीन दर वधारू लागले आहेत. काल देखील जागतिक बाजारात सोयाबीन बाजारभाव वाढले होते. एका मीडिया रिपोर्टनुसार सोयाबीन दर आता गेल्या पाच महिन्यातील विक्रमी पातळीवर पोहचला आहे. यासोबतच सोयापेंडच्या दरात पण वाढ झाली आहे.

यामुळे साहजिकच देशाअंतर्गत सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र तूर्तास तरी या जागतिक समीकरणाचा परिणाम देशातील बाजारात होताना पाहायला मिळत नाही. एकीकडे जागतिक बाजारात सोयाबीन भाव खात आहे तर दुसरीकडे देशात मात्र दर स्थिर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकरी बांधव भविष्यात नेमकी दरात वाढ होईल की नाही याबाबत संभ्रमाअवस्थेत सापडला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की काल सोयाबीनचे जागतिक बाजारपेठेत दर 14.90 डॉलर प्रति बुशेल्सवर पोहोचले होते, जे की अमेरिकेतील या हंगामातील सर्वोच्च दर आहेत.

खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल झाले आहेत. साहजिक चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे, यामुळे मागणी वाढली आहे. आता जागतिक बाजारात अर्जेंटिना आणि ब्राझील या सोयाबीन उत्पादक देशांमध्ये अजून सोयाबीन उत्पादन सुरू झालेले नाही, केवळ अमेरिकेमध्ये सोयाबीनचे उत्पादन हाती आल आहे.

अशा परिस्थितीत या मागणीचा सरळ फायदा अमेरिकेला पोहोचला असून अमेरिकेमध्ये सोयाबीनचे दर गगन भरारी घेताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय अर्जेंटिना आणि ब्राझील मध्ये हवामान बदलाचा मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. अर्जेंटिनामध्ये प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे.

त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आणि उष्णतेच्या लाटा यामुळे सोयाबीनची पेरणी कमी होणार असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. अशा परिस्थिती या बनत चाललेल्या समीकरणाचा सोयाबीन दराला आधार मिळत आहे. तसेच सोयापेंडचे दर जागतिक बाजारात वाढले असल्याने सोयाबीन दराला आधार मिळत आहे.

पण असे असले तरी सोयातेल अजूनही दबावात आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जागतिक बाजारात सोयाबीन दर वाढीसाठी अनुकूल असे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु देशांतर्गत परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत नाहीये. काल सोयाबीन दर स्थिर होते. सध्या भारतात सोयाबीनला बाजार समितीमध्ये 5300 ते 5500 असा दर मिळत आहे तर प्रक्रिया प्लांटमध्ये 5550 ते 5700 प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे.

आता मात्र देशांतर्गत सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये जैवइंधन धोरण जाहीर झाल आहे. तेथील सरकारने b35 च धोरण अंगीकारल आहे. म्हणजेच पाम तेलाचा जैवइंधन म्हणून 35 टक्के वापर करायचं ठरवलं आहे. पूर्वी फक्त तीस टक्के एवढं पामतेल जैव इंधन म्हणून उपयोगात आणले जात होतं. आता यामध्ये वाढ होणार आहे.

म्हणजे पामतेलाची उपलब्धता कमी होईल यामुळे बाजारात इतर खाद्यतेलाचे दर देखील वाढतील. याचा सोयातेलाला आधार मिळेल. सोयातेलाचे दर अजून तेजीत आले म्हणजे देशांतर्गत सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता काही तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

निश्चितच तूर्तास अमेरिकेत सोयाबीन भाव खात आहे आणि भारतात मात्र सोयाबीन दर स्थिर आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र आता काही जाणकारांनी दरवाढीची अशा व्यक्त केली असल्याने सोयाबीन उत्पादक कुठे ना कुठे समाधानी पाहायला मिळत आहे.