Soybean Market : दुष्काळात तेरावा महिना ! सोयाबीन वायद्यावरील बंदी एक वर्ष वाढवली ; सोयाबीन दरावर याचा काय परिणाम होणार?

Soybean Market : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत एका चर्चेला मोठे उधाण आलं होतं. ती चर्चा होती सोयाबीन समवेतच इतर सात शेतमालाच्या वायद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठेल. मात्र आज या चर्चेला पूर्णविराम लागला.

केंद्र शासनाने सोयाबीन समवेतच 7 शेतीमालाच्या वायद्यावर पुढील एक वर्ष बंदी कायम ठेवली आहे. खरं पाहता वायदे बंदीमुळे शेतीमालाच्या दरात घसरण होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. मात्र जाणकार लोकांनी वायदे बंदी अजून एक वर्ष कायम ठेवली असली तरी देखील याचा सोयाबीन दरावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असा दावा केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता गेल्यावर्षी खाद्यतेलाचे दर आकाशाला गवसणी घालत होते. त्यामुळे केंद्र शासनाने वायदे बंदी केली. हे केंद्र शासनाचे मत होते. कारण वायदे बंदी करून देखील खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत शिवाय इतर शेतमालाचे दर देखील कमी झाले नाहीत. मात्र जी काही दरात अजून वाढ झाली असती त्यावर थोडा फरक पडला असावा. खरं पाहता गेल्यावर्षी शेतीमालाचे दर तेजीत असल्यामुळे उद्योग आर्थिक कोंडीत सापडलं होतं. त्यामुळे उद्योगाने वायदे बंदी करण्यासाठी सरकारवर दबाव बनवला.

अखेर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अपयशी ठरलेल्या सरकारने आपला मोर्चा शेतमाल दर नियंत्रित ठेवण्याकडे वळवला. अन गेल्या वर्षी सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, गहू, तांदूळ, हरभरा, कच्चे पामतेल आणि मुगाच्या वायद्यांवर 20 डिसेंबर 2022 पर्यंत बंदी घातली. या वायदे बंदीमुळे पाममतेल आणि मोहरी तेलाचे दर कमी झाले मात्र इतर शेतमालावर याचा फारसा फरक जाणवला नाही. विशेष म्हणजे सोया तेल दर कमी करण्यासाठी केलेला हा आटापिटा फेल झाला कारण सोया तेल अजूनही तेजीतचं आहे.

मग वायदे बंदी करूनही शेतीमालाचे तसेच खाद्यतेलाचे दर नियंत्रित राहिले नाही मग पुन्हा एकदा वायदेबंदी वाढवण्याचं कारण काय हा मोठा प्रश्न आज उपस्थित झाला आहे. दरम्यान आता 20 डिसेंबर 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या शेतमालाची वायदे बंदी कायम राहणार आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार होणार आहे. मात्र जाणकार लोकांनी यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. सरकारने वायदे बंदी केली असले तरी देखील याचा दरावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असं छातीठोकपणे जाणकार सांगत आहेत.

सध्या सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असून हेच बाजार भाव कायम राहणार असल्याचा दावा आहे. मात्र जर वायदे बंदी काढली गेली असती तर कदाचित 200 ते 300 रुपयांपर्यंतची दर वाढ पाहायला मिळाली असती. एकंदरीत जाणकार लोकांनी सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. आता या वायदे बंदीचा नेमका किती आणि कसा परिणाम होतो हे तर येणारा काळच सांगेल मात्र जाणकार लोकांनी याचा सोयाबीन दरावर विपरीत परिणाम होणार नाही अशी भविष्यवाणी केली असल्याने तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.