file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  जिल्ह्यात निवडणूका दूर असल्या तरी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नगर दौऱ्यावर आले आहे.

या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांनी सत्ताधारी महवकास आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. मंत्री, पालकमंत्री त्यांच्या मतदारसंघापुरते काम करतात, बाकी त्यांना काहीही करायचे नाही. उपमुख्यमंत्री पुण्यात आणि मुख्यमंत्री मुंबईत बसतात.

प्रशासनावर सरकारची पकड राहिली नसून महाराष्ट्र पंचवीस वर्ष मागे गेला आहे. तरीही राज्यात सर्व काही अलबेल सुरू असल्याचे भासविले जाते आहे. अशी टीका माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीने राज्यभरात युवकांच्या संघटनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी मंत्री बावनकुळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

शनिवारी संगमनेरातील डेरे इंग्लिश मिडियम स्कूल येथे आयोजीत पत्रकार परिषदेत माजी मंत्री बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, भाजपचे संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान या दौऱ्यादरम्यान भाजपचे हे नेते जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आगामी नऊ महिन्यांनी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने भाजप तयारीला लागले असून, बावनकुळे काय कानमंत्र देणार, हे लवकरच निश्चित होणार आहे.