अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- सध्या कोरोना, अतिवृष्टी,पूर,महागाई आणि आता भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र यात सर्वसामान्य माणूस पुरता पिचला आहे. अलीकडे शहर व उपनगरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

पूर्वी हे प्रमाण कमी होते मात्र काही दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये तब्बल १० दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

परंतु काहीजण गाडी तर गेली पण नको ती झंझट या मानसिकतेतून पोलिसात गुन्हा दाखल करत नाहीत. ते तर वेगळेच, या पूर्वीही गेल्या महिनाभरात शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

मात्र त्याचा शोध घेण्यात शहर पोलिस अपयशी ठरले आहेत. शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीला जात आहेत. या मध्ये सर्वाधिक प्रमाण तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आहे. रात्रीच नव्हे तर दिवसा ढवळ्या ही घर, दुकान, कार्यालयासमोर लावलेल्या दुचाक्या चोरीला जात आहेत.