file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत.

मात्र या २५ जिल्ह्यांमध्ये अहमदनगर चा समावेश नाहीय. राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये निर्बंध कायम राहतील.

हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत. सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी सांगितलं.

लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील दुकानांमध्ये वेळेत वाढ, तसेच उपाहारगृहांच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते.

राज्यात एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये परभणी, बुलडाणा, धुळे, नांदेड, हिंगोली, अमरावती, वाशिम, वर्धा, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा समावेश आहे.