file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  नेवासे तालुक्यात भाजपला पूर्णपणे मरगळ आली आहे. पक्ष वाढवण्यासाठी कष्ट करणारे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. लोकप्रतिनधी असूनही तालुक्यात पक्षाची पिछेहाट होणे, पक्ष संघटन न वाढणे, निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद न देता केवळ फक्त नातेवाईकांनाच सक्षम करण्याची मुरकुटे यांची कार्यपद्धती आहे.

याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे युवा नेते अनिल ताके यांनी म्हटले आहे. मुळा सहकारी साखर कारखाना, शनी शिंगणापूर देवस्थान निवड, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुक, नेवासा नगर पंचायत निवडणुकीसह तालुक्यातील काही महत्वपूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीत मुरकुटे यांनी बोटचेपी व तडजोडीची भूमिका घेतली.

त्यामुळे तालुक्यात पक्षाचे संघटनात्मक नुकसान झाले. पक्ष खिळखिळा झाला अाहे. ही बाब पक्षश्रेष्ठींना निदर्शनास आणुन दिल्याने मुरकुटे यांनी दिनकर गर्जे व पोपट जिरे यांचे निलंबन केले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे यांचा कुकाणा गटातून पराभव करण्यासाठी मुरकुटे यांनी राष्ट्रवादी उमेदवाराशी हातमिळवणी केली. त्यामुळे गर्जे याना पराभूत झाले.

घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सचिन देसर्डा यांनी सरपंचपदावर उभा केलेल्या अधिकृत उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मुरकुटेंनी विरोधकांशी तडजोडीची भूमिका घेतली, असा आरोपही अनिल ताके यांनी केला आहे. तालुक्यातील इतर भाजप नेत्यांमध्ये नेतृत्वाचे चांगले गुण आहेत.

माजी जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे किंवा विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांपैकी एकाला विधानसभेचा उमेदवार म्हणून घोषित करावे. तरच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश मिळेल. अन्यथा भाजपच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो. याला सर्वस्वी बाळासाहेब मुरकुटे जबाबदार असतील, असा इशाराही ताके यांनी दिला आहे.