भाजपाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद कर्जत तालुक्यात उमटले आहेत.

मुंढे त्यांच्या वक्तव्याचा कर्जत शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. मुंढे हे प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हणाले होते, संजय राऊत हा एखाद्या चौकात नागडा करुन हाणायजोगा माणूस आहे.

इतका भंगार माणूस, खरं काय खोटं काय त्याची तमा तो बाळगीत नाही. यामुळे आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड यांनी पत्रक काढून या वक्तव्याचा निषेध केला आहे.

त्यांनी म्हटले आहे, अरुण मुंढे यांनी आमचे नेते संजय राऊत यांची व समस्त शिवसैनिकांची जाहीर माफी मागावी अन्यथा दोन दिवसात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. ही धमकी समजा किंवा इशारा.

माफी मागितली नाही तर मुंढे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. अरुण मुंढे यांना आमचे आव्हान आहे की त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्यासाठी त्यांनीच नगरमधील चौक, दिवस व वेळ सांगावा आम्ही संजय राऊत साहेबांना घेऊन येऊ. अन्यथा तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी व कोणत्या चौकात उघडे नागडे करून हाणून दाखवू.