अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

त्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या सकाळी साडे अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. सदिच्छा भेट देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

राज ठाकरेंना भेटण्यासाठी उद्या सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंजवर बंगल्यावर मी जात आहे. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतची भूमिका यासंदर्भात मी चर्चा करण्यासाठी त्यांना भेटणार आहे.

सध्या युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, मी एकटा निर्णय करणारा नाही. आमच्याकडे तीन निर्णयकर्ते आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईतील महापालिका निवडणुकींना आता काही महिन्यांचा अवधी बाकी आहे.

त्याआधीच भाजपने मुंबई महापालिकेचा ताबा शिवसेनेच्या हातातून काढून घेण्यासाठी सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्यामुळे आता राज्यातील सर्वांचेच या बैठकीकडे लक्ष लागून राहिलंय.