अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर शहरात सुरू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाची भाजपकडून जाहिरात केली जात आहे. भाजपने ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘धन्यवाद मोदीजी’ अशा आशयाचे फलक लावले आहेत.

परंतु, त्यासाठी रीतसर परवानगी घेतली न गेल्याने भाजपला कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मोफत लसीकरण अभियानाची जाहिरात करणारे फलक महापालिकेने मंगळवारी हटविले. या कारवाईवरून भाजपच्या नेत्यांनी फोन करून पालिकेला जाब विचारला. त्यामुळे भाजपचे फलक हटविण्याची मोहीम थांबविण्यात आल्याचे समजते.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत व्यापकपणे राबवण्यात येत आहे. यातच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लसीकरण करून घेतले पाहिजे यासाठी नागरिक देखील सकारात्मक आहे. मात्र या मोहिमेत आता राजकीय प्लेक्सबाजी समोर येऊ लागली आहे. व याच फ्लेक्सबाजीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या लसीकरण केंद्राबाहेर दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने मोठे फलक लावण्यात आले होते. या फलकावर वरच्या बाजूला स्व. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंढे आणि बाळासाहेब विखे यांचे पासपोर्ट साईज फोटो आहेत. फलकाच्या दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फाेटो आहे.

फलकावर मध्यभागी ‘सर्वांना मोफत लस’ असे ठळक अक्षरात लिहिलेले आहे. त्याखाली ‘जगातील सर्वांत मोठे मोफत लसीकरण अभियान’ असा मजकूर आहे. पंतप्रधानांच्या फोटोखाली ‘धन्यवाद मोदीजी’ असे पांढऱ्या अक्षरात लिहिलेले असून, भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी फलकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत.

मोफत लसीकरणाची जाहिरात करणाऱ्या फलकांबाबत पालिकेला तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी नागापूर, भोसले आखाडा, मुकुंदनगर येथील लसीकरण केंद्राबाहेर लावलेले फलक हटविले. या कारवाईवरून भाजपच्या नेत्यांनी फोन करून पालिकेला जाब विचारला. त्यामुळे भाजपचे फलक हटविण्याची मोहीम थांबविण्यात आल्याचे समजते.