अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातील वाकडीच्या उपसरपंच जयश्री जाधव यांचे पती हे विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेले असता दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात कोणासही इजा झाली नाही. दोघे मात्र बालंबाल बचावले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वाकडी ग्रामपंचायतचे उपसरपंच जयश्री जाधव यांचे पती सुरेश जाधव यांचे वाकडीतीलच पिंगळवाडी शिवारात जमीन आहे.

काल रात्रीच्या दरम्यान सुरेश जाधव हे आपल्या चुलत भाऊ सोपान जाधव यांचे बरोबर दुचाकीवर विद्युत मोटार बंद करावयास गेले असता विद्युत मोटार बंद करुन घरी परतांना दडी धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला.

अचानक घडलेल्या प्रकारामुळे दोघेही अगोदर घाबरले. परंतु बिबट्या लक्षात येताच यांनी दुचाकी भरधाव वेगाने काढत तिथून निसटून आले. बिबट्याची झेप चुकवल्यानंतर सदर बिबट्याने मोठ्याने डरकाळी देखील फोडली.

दैव्य बलवत्तर म्हणून कोणासही इजा झाली नाही. बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्यामुळे याभागात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.