राहुरी :- लोकसंपर्क असल्याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. लोकसभा निवडणूक लढवायचीच हा माझा निर्णय पक्का असून त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून माझी तयारी सुरू आहे. मतदारसंघातील बहुतांशी जनतेने खासदार कोण हे निवडणुकीनंतर बघितलेले नाही, हे दुर्दैव आहे.
जनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन.
काही राजकारण्यांना मी नको आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन, असा विश्वास डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी व्यक्त केला. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, कुरणवाडी, मल्हारवाडी या पश्चिम भागात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ. विखे बोलत होते.
…म्हणूनच मला या निवडणुकीत उभे राहायचेय.
डॉ. विखे पुढे म्हणाले, लोकसभेसाठी राहुरी तालुक्यातील जनतेची भूमिका नेहमी निर्णायक राहिली आहे. मला थांबवण्यासाठी काही पुढाऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडता येत नाहीत, म्हणूनच मला या निवडणुकीत उभे राहायचे आहे.
खासदार झाल्यास मी राहुरीच्या जनतेचा आवाज बनेन.
लोकतांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून मला तो हक्क असल्याने लोकसभा निवडणुकीत मी जनतेला अजमावून पाहणार आहे. या भागातील जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माझी धडपड असल्याने खासदार झाल्यास मी राहुरीच्या जनतेचा आवाज बनेन म्हणूनच मला पुढे जाऊ द्या, असे डॉ. विखे म्हणाले.