जगाला हादरवणारा कोरोना… अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात पोहोचलाच नाही ! एकही नागरिक बाधित नाही…

गेल्या दोन – तीन वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असं प्रत्येकाला वाटतं.

मात्र ते पूर्णतः खरं नाही. जगात असेही अनेक ठिकाणे आहेत जिथं आतापर्यंत एकदाही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. जाणून घेऊया अश्याच एका आपल्या नगर जिल्ह्यातील गावाबद्दल. (Corona has not reached this village in Ahmednagar district!)

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना पाथर्डी तालुक्यातील अंबिकानगर हे गाव मात्र यापासून कोसो दूर राहिले. मागील दोन वर्षांमध्ये अद्यापर्यंत गावातील एकही व्यक्ती कोरोना बाधित झालेला नाही.

पाथर्डी शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर अंबिकानगर हे गाव आहे. या गावापासुन बीड जिल्ह्याची हद्द अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर नगर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

सुमारे बाराशे लोकवस्तीचे अंबिकानगर गाव असून या गावांमध्ये अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. बहुतांशी नागरिक कष्टकरी असल्याने अनेकदा गावाबाहेर देखील त्यांना रोजगार मिळवण्यासाठी जावे लागते.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरापेक्षाही बीड शहर हे अंबिकानगरवासियांना अंतराने जवळचे असल्याने नगर, पाथर्डीसह बीड व जिल्ह्यातील शिरूर तालुका या भागांमध्ये शासकीय, शैक्षणिक, रोजगारसह विविध कामांसाठी गावातील नागरिक भटकंती करत असतात.

मात्र, कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व नियम गावकरी काटेकोरपणे पाळत असल्याने या गावातील महिला, पुरुषांसह एकही आबालवृद्ध कोरोनाच्या मगरमिठीत सापडलेला नाही.

या दरम्यानच्या काळात गावच्या सरपंच स्व. सत्यभामा ढाकणे यांनी देखील नियमित गावातील नागरिकांच्या संपर्कात राहून प्रबोधनाबरोबरच मोफत मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.

अंबिकानगर हे संपूर्ण गावच माझे कुटुंब असल्याचे ते नेहमी सांगत. गावातील गरजूंना अन्नधान्यासह आवश्यक वस्तू नेहमी मोफत पुरवण्याचे काम त्यांनी केले. केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याची परतफेड म्हणून अठरापगड जातीचे गाव असून देखील कुठलीही नवी जातीय समीकरणे तयार न करता सलग तीन वेळेस स्व. ढाकणे यांना सरपंच पदाचा सन्मान दिला.

त्यांचे पंधरा दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, त्यांनी ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव कसा करावा, याचा दिलेला मूलमंत्र गावकरी निश्चितच आगामी काळात पाळतील. विविध जाती धर्माच्या सुमारे बाराशे नागरीकांची लोकसंख्या असून देखील अद्यापर्यंत एकही व्यक्ती बाधित नाही.