अहमदनगर: राष्ट्रवादीच्या दोन गटात नगर शहरातील नंदनवन लॉनसमोर झालेला राडा आणि त्यानंतर दोन्ही गटांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, प्रकरण आपसात तडजोड होऊन मिटल्यानंतर कोतवाली पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे,यांच्या सह राष्टवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जगताप – कळमकर गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. शरद पवार यांची पाठ वळताच आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांना धक्काबुक्की करत शिव्यांची लाखोली वाहिली.
त्यामुळे संतापाचा कडेलोट झालेल्या कळमकरांनी फिर्याद देण्यासाठी थेट कोतवाली पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर माजी आमदार दादाभाऊ कळमकर व आ. संग्राम जगताप या दोघांनीही पोलिस ठाणे गाठले. दोघांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला आणि प्रकरण मिटले.
दरम्यान, या राडा आणि गोंधळबाजीची दखल घेत कोतवाली पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली. पो. कॉ. लहाडे यांच्या फिर्यादीनुसार गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ, दमदाटी व आपसात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कोतवालीचे पोलिस निरीक्षक विकास वाघ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.