जिल्हा बॅंकेसाठी पहिल्या दिवशी २३ जणांनी नेले १५३ अर्ज !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या महत्वपूर्ण निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि.२५ जानेवारी पर्यंत आहे. काल पहिल्या दिवशी २३ व्यक्तींनी १५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. मागील चार महिन्यापासून बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीचे पडघम वाजत होते. निर्धारीत प्रक्रियेनंतर दि. ७ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणा बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांच्या मंजुरीची मोहोर उमटली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या निवडणूक प्रक्रियेची सूत्रे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

या निवडणुकीद्वारे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे १४, शेतीपुरक, प्रक्रिया, पणन मतदार संघ १, बिगर शेती संस्था १, महिला प्रतिनिधी २, अनुसुचित जाती जमाती १, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १ आणि विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग १ असे एकूण २१ संचालक निवडले जाणार आहेत.