मुळा जलाशयात ४२ वर्षांच्या महिलेची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- मुळा धरणावर नव्याने सुरू झालेल्या मत्स्यपालन केंद्राजवळील पाण्यात ४२ वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली. या घटनेमुळे मुळा धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

ही महिला राहुरीच्या करपे इस्टेट येथील सविता देठे असल्याचे समजते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचेे कारण समजले नाही.

मंगळवारी दुपारी सव्वाच्या सुमारास मुळा धरणावरील नगर एमआयडीसी उपसा केंद्राच्या परिसरात असलेल्या मत्स्यपालन केंद्राजवळ ही घटना घडली.

एमएच १५ एफजी १६७९ या दुचाकीवर ही महिला धरणावर आली. हातातील मोबाइल पाण्यात फेकून देत या महिलेने पाण्यात उडी मारली.

हा प्रकार परिसरातील मच्छिमारांनी पाहिला. मारूती गायकवाड, सुनील माळी, साहेबराव जाधव, करण परदेशी, दत्तात्रेय वायसे, नाना पवार, राजू सोनवणे, गणेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या महिलेचा शोध घेतला.

पावणेदोनच्या सुमारास मृतदेह हाती लागला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली.

मात्र, दुपारी ३ पर्यंत या भागात नियुक्ती असलेले पोलिस फिरकले नाहीत. साडेतीन वाजेपर्यंत या महिलेची ओळख पटू शकली नव्हती.

संध्याकाळी उशिरा महिलेचे नाव समजले. या महिलेच्या पर्समध्ये आणखी दोन मोबाइल आढळून आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24