file photo

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोरोना काळातही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लाचखोरीच्या प्रकरणे घडलेलीच दिसून आली. नुकतीच या यादीत महसूलविभागाने अव्वल स्थान देखील मिळवले होते.

जिल्ह्यातील लाचखोरी सुरूच असून पुन्हा असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर तालुक्यातील मांडवे येथील ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामसेवक गणेश जनार्दन देहाडे (वय 42 रा. कल्याण रोड, नगर) व ग्रामरोजगार सेवक अशोक भानुदास निमसे (वय 48 रा. मांडवे ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे नगर तालुक्यातील मांडवे येथे एमआरईजीएस योजने अंतर्गत विहिर मंजुर झालेली आहे.

विहिरीचे 42 हजार रूपये अनुदान मंजुरीचा प्रस्ताव नगर पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ग्रामसेवक देहाडे व ग्रामरोजगार सेवक निमसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

त्याच दिवशी लाचलुचपत विभागाने नगर शहरातील न्यू टिळक रोडवरील हॉटेल नंदनवन येथे सापळा लावला. त्यावेळी देहाडे व निमसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रूपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

म्हणून मंगळवारी देहाडे व निमसे यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच नगरच्या लाचलुचपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे.