अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या यादीत असणार्‍या संगमनेर तालुक्यातील आठ रुग्णालयांच्या नावात आता धर्मादाय असा उल्लेख होणार आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्वचं मुद्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे ठरले. तालुक्यातील 8 धर्मादाय रुग्णालयांबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील वामनराव इथापे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, दर्शन रोटरी आय हॉस्पिटल,

संजीवन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सौ.मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्टचे डेंटल हॉस्पिटल, अमृतवाहिनी रुरल हॉस्पिटल, अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल,सिद्धीकला हॉस्पिटल, वृंदावन (जनरल) या रुग्णालयांच्या नावात धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख करण्यासाठी सर्वांना पत्र दिले जाणार आहे.

8 पैकी ज्या धर्मादाय रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या रुग्णालयांत उपचार घेतलेल्या 10 टक्के किंवा पूर्ण कोट्यातील सर्व रुग्णांच्या बिलाचे पुनर्लेखापरीक्षण केले जाणार आहे. तिथे उपचार घेतलेल्या दुर्बल व निर्धन रुग्णांना त्यांच्या बिलाची रक्कम परत देण्यात येईल आणि त्या सर्व संबंधित धर्मादाय रुग्णालयांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बैठकीत ठरले.

त्या रुग्णालयावर कारवाई होणार ! ज्या खासगी रुग्णालयांनी करोना रुग्णांचे नियमानुसार बिले वसूल केली की नाही त्याबाबत बिलाचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत दिली जाणार आहे. ज्या लेखापरीक्षकांनी यात दुर्लक्ष केले त्यांच्यासह त्या रुग्णालयांवरही कारवाई केली जाणार आहे.