अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून, जागतिक आरोग्य संघटनेने देखील याला पुष्टी दिली आहे. अहमदनगर जिल्हा कोरोना लसीकरण मध्ये आघाडीवर आहे. सर्वांना लस उपलब्ध व्हावी या भावनेने लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

आर्थिक कुवत असलेल्या नागरिकांनी अशा हॉस्पिटलमध्ये लसीकरण केल्यास सर्वसामान्य व गोर गरीब नागरिकांना महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोफत लस सहज उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

तारकपूर येथील लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महापालिकेच्या मान्यतेने कोरोना लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करुन धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे, इंजी. विजयकुमार पादीर, लाईफ लाईन ग्रुप ऑफ कंपनीज चे संचालक नवनाथराव धुमाळ, हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप धुमाळ आदिंसह हॉस्पिटलचे कर्मचारी व लसीकरणासाठी आलेले नागरिक उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले की, लाईफ लाईन हॉस्पिटलची सुरुवातच सामाजिक उपक्रमांनी सुरु झाली. गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटलच्या वतीने विविध शिबीर घेण्यात येतात. धुमाळ परीवाराने कोरोना काळात गरजूंना मोठ्या प्रमाणात अन्नदान केले आहे व सध्या ही करत आहेत. शहरात लसीकरण केंद्र कमी असल्याने गर्दी होत आहे.

तर केंद्र सरकारकडून लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारला लस वितरण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही सामाजिक संघटनांना एकत्रित करुन देणगीतून सर्वसामान्यांसाठी लस विकत घेऊन उपलब्ध करण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपत बारस्कर म्हणाले की, तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरु झाल्याने महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

एन.बी. धुमाळ व त्यांचा परिवार सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गोरगरीबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून आले असून, कोरोना काळात त्यांनी अनेकांना सहकार्य केल्याचे सांगितले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप धुमाळ यांनी महापालिकेच्या परवानगीने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या कोविशिल्ड 780 रुपये तर कोव्हॅक्सिन 1410 रुपये दराने नागरिकांना लस मिळणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यावर 28 दिवसांनी दुसरा डोस व कोव्हीशील्डचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घेता येतो.

लसीकरण सेवेचा फायदा करून आपले जीवन सुरक्षित करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनाथराव धुमाळ यांनी दुसर्‍या लाटेत अनेक नागरिक कोरोनाने मृत्यूमुखी पडले. यामध्ये अनेक रुग्ण घाबरुन बळी पडले आहेत. नागरिकांनी न घाबरता लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

व्यायाम व आहार उत्तम ठेवल्यास घाबरण्याची गरज नाही. माणसाची किंमत पैश्यात केली जाऊ शकत नसल्याने ज्यांना शक्य आहे त्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करुन आपले कुटुंब सुरक्षित करून घेण्याचे आवाहन केले.

यावेळी अनेक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या नांव नोंदणीसाठी 0241-2324583, 9028316789, 9028616789 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.