file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची बाधा वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. यातच आता कारागृहातील कैद्यांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून हि धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेवासा येथील कारागृहातील 17 कैदी करोनाबाधित आढळून आले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरला पाठविण्यात आले आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, 24 जुलै रोजी कारागृहातील काही आरोपींना त्रास जाणवू लागल्याने सर्व 70 आरोपीची करोना चाचणी करण्यात आली.

त्यातील 17 आरोपी करोना बाधित आढळून आले असून यामधील नेवासा पोलीस ठाण्यातील दहा, सोनई पोलीस ठाण्यातील सहा व शिंगणापूर पोलीस ठाण्यातील एका आरोपीचा समावेश आहे. या 17 कोरोना बाधित आरोपींपैकी 15 जणांना अहमदनगर येथे पाठवण्यात आले असून एकास नेवासा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

एक आरोपी पोलीस कोठडीत असल्याने त्यास वेगळ्या बराकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.. नेवासा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीतील 60 तर पोलीस कोठडीतील 10 आरोपी आहेत.

येथील कारागृहात पाच बराकी असून त्याची क्षमता 25 आरोपींची आहे. या पाच बराकी क्षमतेपेक्षा जवळपास तिप्पट आरोपी ठेवले जात आहेत.