अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- करोनामुळे अर्थचक्रावर मोठे परिणाम झाले आहे. यातच गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील 40 पाणी योजनांची 37 कोटी 86 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामुळे महावितरणने या योजनांना नोटीस बजावली आहे.

राज्य सरकारने याबाबत आदेश दिलेले असल्याने महावितरणने थकबाकी असणार्‍या पाणी योजनेची वीज तोडली नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात 43 पाणी योजना असून यात काही प्रादेशिक तर काही स्वतंत्र नळ पाणी योजना आहेत.

यातील 3 योजना या जिल्हा परिषद स्तरावरून चालविण्यात येत असून यात बुर्‍हाणनगर पाणी योजना, शेवगाव आणि पाथर्डी तर गळनिंब पाणी योजनेचा समावेश आहे. उर्वरित 40 ठिकाणी पाणी वापर समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून योजनेत समावेश असणार्‍या गावातील नळ जोड असणार्‍या

कुटूंबाकडून पाणीपट्टी वसूल करून त्याव्दारे योजनाचा खर्च, वीज बिल आणि जलसंपदा विभागाची पाणीपट्टी अदा करण्यात येत आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या करोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. यामुळे प्रादेशिक आणि अन्य पाणी योजनांचे पाणीपट्टी वसूलीस अडथळा निर्माण झाला आहे.

याचाच विचार करून राज्य सरकारने 15 व्या वित्त आयोगातील निधीतून पाणी योजनांचे वीज बिल, ग्रामपंचायतीचे पथ दिव्यांचे वीज महावितरणाला अदा करण्यास परवानगी दिलेली आहे.

दरम्यान, संबंधीत पाणी योजनांनी आधी स्व निधी, त्यानंतर पाणीपट्टी वसूली आणि गरज भासल्यास 15 वित्त आयोगाच्या निधीतून काही पैसे घेवून महावितरणची वीज बिल भरावी, त्यानंतर शिल्लक पाणीपट्टी वसूल करून ती पुन्हा वित्त आयोगाच्या पैशात टाकून देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.