अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- शिर्डीतील बांधकाम मजूर हत्याकांडातील पसार झालेले तिघे आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

या गुन्ह्यातील एकूण सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले. शिर्डीतील बांधकाम मजूर राजेंद्र आंतवन धिवर याची शिर्डीत अज्ञात इसमांनी धारदार शस्राने हत्या करत हल्लेखोर पसार झाले होते.

याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं 237/2021, भादंवि कलम 302, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून उघडकीस आणला होता.

यातील नाशिक येथील दोघेजण तर शिर्डीतील दोनजण अशा चार आरोपींना ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा जसजसा उलगडा झाला त्यानंतर गुन्ह्यात निष्पन्न झालेले वरील आरोपींचे साथीदार हसीम खान, रा. नालासोपारा, गॅस उर्फ साहिल शेख, रा. मोरवाडी, नाशिक व साहिल पठाण, रा. पाथर्डी गाव, नाशिक हे पसार झालेले होते.

हे आरोपी हे मुंब्रा, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या परिसरामध्ये वेळोवेळी ठिकाणे बदलून व आपले अस्तित्व लपवून राहत होते. पोलीस तेथे पोहचेपर्यंत ते ठिकाण सोडून निघून जात होते.