अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या होऊनही त्याचा तपास लागत नसल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

दरम्यान गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे सोमवारी केली.

आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह मुख्य बाजारपेठेत, नागरी वसाहतीत, मोठ्या प्रमाणात घरफोड्या, भुरट्या चोऱ्या, वाहनचोरी, वर्दळीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडत आहेत.

तसेच गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पोलिसांबाबत नाराजीची भावना आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत वेळोवेळी पोलिसांशी संपर्क केला, परंतु, पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

गुन्हेगारांवर पोलिसांचा जरब राहिला नसल्याचे दिसून येत असून, याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

दरम्यान कोरोना काळामुळे लोकांचे धंदे पाणी बंद आहे लोकांना काम धंदे नाहीत त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरात उपनगर परिसरात काही दुकानांचे शटर वाकून चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळते.

शहरात अवैध धंदे, मटका,असे अवैध धंदे बोकाळले आहेत. मात्र पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात थातुरमातुर कारवाई पोलीस करतात. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे