अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला वर्ष उलटून गेले. यातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याचा जप्त केलेल्या मोबाईलचे लॉक अद्यापही उघडलेले नाही.

कंपनीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक उघडावे, अशी मागणी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेखा जरे हत्याकांडाला एक वर्ष उलटून गेले. सध्या बोठे हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला अटक होऊन एक वर्ष उलटून गेले.

त्याच्याकडील मोबाईलचे लॉक उघडण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. परंतु, सदर मोबाईलचे लॉक उघडले किंवा नाही, याचा बोध होत नाही.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगाराच्या मोबाईलचा लॉक उघडत नाही, हे न समजण्यापलीकडे आहे. आरोपी बोठे याच्या मोबाईलचे लॉक उघडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अन्यथा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाईलचे लॉक उघडल्यास उर्वरित तपासाला गती मिळेल. यातून अनेक महत्वपूर्ण बाबी समोर येतील, असे अ‍ॅड. लगड यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठविण्यात आली आहे.