अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- तीन जिल्ह्यात घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे नावावर असलेले आरोपी अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (दोघे रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), तिसरा आरोपी (रा. काष्टी) या तिघांच्या खडकी (ता. दौंड) येथे जाऊन श्रीगोंदे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Ahmednagar News)

हे आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होते. या अट्टल आरोपींविरोधात आधीच तब्बल १२ जबरी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कडून १० हजार रुपये किंमतीचे लिंबू बागेतील चोरलेले लिंबू व एक दुचाकी हस्तगत केली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी माहिती देतात सांगितले की, २२ रोजी सुरेश राजाराम गावडे (रा. काष्टी) यांच्या शेतातील लिंबू चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीगोंदे तालुक्यात चोरी आणि दरोडा या गुन्ह्यातील हवे असलेले आरोपी खडकी (ता. दौंड) येथील शिवारात असल्याची माहिती मिळताच दौंडचे पोलिस निरीक्षक यांना कल्पना देऊन त्यांच्या मदतीने खडकी येथे सापळा लावून आरोपी जेरबंद केले.

आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून काष्टी येथील सुरेश राजाराम गावडे यांच्या लिंबू बागेतील १० हजार रुपये किंमतीचे चोरलेले लिंबू उसाच्या फडात लपवून ठेवले होते.

पोलिसांनी लिंबू व मोटारसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आकर्षण उर्फ अक्षय पवार याच्यावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात दोन व करमाळा जि. सोलापूर येथे दोन असे चार गुन्हे दखल आहेत.

तर संतूर भोसले याच्यावर दौंड आणि श्रीगोंदे येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तिसरा आरोपी सुरेश भोसले याच्यावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तब्बल ६ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे निरीक्षक ढिकले यांनी सांगितले. या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.