file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- मनपाच्या पथकांमार्फत गर्दी करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दररोज दंड आकारला जात आहे. तथापि, गर्दी मात्र कमी झालेली नाही.

रविवारी शहरातील पथकांनी ३७ हजारांचा दंड वसूल केला. शहरात अजुनही बेफिकीर नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याने रुग्णसंख्या वाढीचा विस्फोट होण्याची धास्ती आहे.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज सुमारे २० ते ३० पर्यंत वाढत आहे. बाजारपेठेत गर्दी कमी होत नसल्याने कोरोनाचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून मनपाने दक्षता पथक नेमले आहेत. या पथकांमार्फत शहरात दररोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात दुकानांचा समावेश आहे.

नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या बिग बाजार मॉलवर एकाच तासात दोनवेळा कारवाई केली. तोफखाना पोलिस आणि त्यानंतर मनपाच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली.

विकएन्डला संचारबंदी आणि आरोग्य वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना बिग बजार हा मॉल सुरू होता. यावेळी अनेक ग्राहक खरेदी करत गर्दी झाली होती.

मॉल सुरू असल्याची माहिती तोफखाना निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहायक निरीक्षक किरण सुरसे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

सुरसे यांनी पाहणी केली असता बिग बाजार मॉल सुरू असून ग्राहकांची मोठी वर्दळ तेथे दिसून आली. यावरून मॉलवर कारवाई करत पाच हजारांचा दंड केला. नंतर मनपा दक्षता पथकाने पंचवीस हजारांचा दंड ठोठावला.