अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पती व सासू-सासर्‍यांना अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच तपास अधिकारी आरोपींना मदत करत असल्याचा आरोप करुन तपास अधिकारी बदलून मयत महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

यावेळी आरपीआय अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, जमीर इनामदार, आमीन पठाण, संतोष पाडळे, आफाक शेख आदी उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील द्रोणागिरी कॉलनी येथे राहणार्‍या आमरीन मोजम शेख या विवाहित महिलेने 12 जुलै रोजी पती व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. 13 फेब्रुवारी 2020 रोजी मयत महिलेचे मोजम शेख या युवकाशी लग्न झाले होते.

लग्नाच्या एका वर्षानंतर आमरीन हिला पैशासाठी मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे काम त्याच्या सासरच्या कुटुंबीयांनी केले. पती देखील तिला वारंवार मारहाण करीत होता. विवाहित महिलेने माहेरी आल्यावर सर्व प्रकार तिचे आई, वडिल व भावाला सांगितला.

याप्रकारानंतर तिचा पती सासरी घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला या प्रकाराबद्दल विचारले असता त्याने कुटुंबीयांशी गोड बोलून आपल्या पत्नीला सासरी घेऊन गेला. 12 जुलै रोजी आमरीन हिला तिचा पती, सासू व सासर्‍यांनी बेदम मारहाण केली.

सदर महिलेने आपल्या भावाला फोन करुन सर्व प्रकार सागितला व अशी मारहाण दररोज होत असल्याचे कळवले आणि फोन ठेवून दिला. तर या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी या विवाहित महिलेने एका चिठ्ठी लिहून ठेवली होती.

मयत महिलेने पायावर सदर चिठ्ठी कुरान ग्रंथात ठेवल्याचे लिहिले असल्याचे तिच्या भावाने शवविच्छेदन करताना पाहिले. त्याने तातडीने बहिणीच्या सासरच्या घरी जाऊन कुरान ग्रंथातून चिठ्ठी काढली. मात्र ती चिठ्ठी तपास अधिकारी राजू थोरात याने वाचू न देता हिसकावून घेतली.

ही चिठ्ठी तपास अधिकारी याने घरच्या कोणत्याही सदस्यांना पाहू दिली नाही. या प्रकरणी पती, सासू व सासरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरण कोर्टात सुनावणी वेळेस चिठ्ठी नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

मात्र हा प्रकार कोर्टास फिर्यादी शब्बीर पठाण याने सांगितले असता, सदर चिठ्ठी कोर्टात न देता त्याचे छायाचित्र सादर करण्यात आले. तपास अधिकारी लोभापाई आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रश्‍नी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन देखील कार्यवाही झालेली नाही.

या प्रकरणात सासर्‍याला अटक असून, सासू व मुलगा अजूनही फरार आहे. आत्महत्येस कारणीभूत असलेल्या उर्वरीत दोन आरोपींना अटक व्हावी व तपास अधिकारी बदलण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा न्याय मिळण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.