अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- करोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून मंगळवारी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मास्क, शारिरीक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

दरम्यान येत्या 17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 वी आणि शहरी भागातील 8 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे.

यामुळे जिल्हाधिकारी भोसले काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील करोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत.

राज्य सरकारने 2 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’मधील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, बीड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, रायगड , पालघर जिल्ह्यातील करोना परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना अधिकार देण्यात आले आहेत.